कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस भाजपमध्ये सत्तास्थापनेवरून पेच निर्माण झाला आहे. अशातच बहुजन समाजवादी पार्टीच्या सर्वेसर्वा मायवती यांनी निवडणुकीतील परावभवाचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसनं जेडीएसला भाजपची ‘बी टीम’ सांगून मुस्लिम मतदारांची मतं विभागली त्यामुळेच मुस्लिमबहुल जागांवर अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. जर काँग्रेसनं प्रचाराच्यावेळी ही चूक केली नसती तर भाजपचे १०४ उमेदवार आज निवडून आले नसते असं त्या म्हणाल्या.

बहुमत नसतानाही केवळ एकमेव मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देऊन १५ दिवसांत बहुमत सिद्ध करण्यात सांगितले. काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात येडियुरप्पांचा असंविधानिक पद्धतीने होणारा शपथविधी रोखण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ‘भाजप सत्तेत आल्यापासून लोकशाही मुल्यांचा गैरवापर करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेलं संविधानच नष्ट करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत. अनेकदा भाजपनं सत्तेचा गैरेवापर केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक हे त्याचं ताजं उदाहरण आहे असं सांगत मायवती यांनी गुरुवारी भाजपवरदेखील तोफ डागली.

पण याचबरोबर राहूल गांधी यांनादेखील त्यांनी पराभवास कारणीभूत ठरवलं आहे. निवडणूक प्रचाराच्यावेळी राहुल गांधी यांनी जेडीएसवरही टीका केली होती. त्यांचा हाच प्रचार भाजप आणि आरएसएससाठी फायदेशीर ठरला. काँग्रेसनं जेडीएसला भाजपची बी टीम म्हटलं होतं, यामुळेच अनेक मुस्लिमबहुल भागांत काँग्रेसची मतं विभागली गेली. मुस्लिम मतं विभागली गेल्यानं याचा फटका काँग्रेसबरोबर, जेडीएसलाही बसला त्यामुळे दुर्दैवानं याठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले.

आपल्या व्यक्तव्यांचा फायदा दुसऱ्या पक्षाला होऊ नये याची पुरेपुर काळजी आता काँग्रेस पक्षानं घ्यावी, आता तरी जनता दल सेक्यूलरला भाजपाची बी टीम म्हणू नका  पुढच्या निवडणुकीत ही गोष्ट लक्षात ठेवून काँग्रेसनं चालावं असा सल्लाही यावेळी मायवती यांनी दिला.