काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी रायबरेलीमधील काँग्रेस आमदार अदिति सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राहुल यांनी अदितिला अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्त केले आहे. दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर राहुल गांधी आणि अदिति सिंह विवाहबंधनात अडकणार असल्याची अफवा पसरली होती.

अदिति यांनी लग्नाची चर्चा फेटाळून लावताना हे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले होते. राहुल आणि आपल्यामध्ये बहिण-भावाचे नाते असून व्हायरल झालेले फोटो कौटुंबिक समारंभातील आहेत असे अदिति यांनी सांगितले होते.

अदिति रायबरेलीमधून पाच वेळा आमदार राहिलेल्या अखिलेश सिंह यांची मुलगी आहे. अदितिने २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. प्रियंका गांधी वाड्रा यांच्या त्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. अदितिने अमेरिकेच्या ड्यूक विद्यापीठात मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. २०१७ साली विधानसभेची पहिलीच निवडणूक लढवताना त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला ९० हजार मतांच्या फरकाने हरवले होते.