मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्यातरी काँग्रेस-भाजपाकडून प्रचाराची दणक्यात सुरुवात करण्यात आली आहे. चित्रकुट येथे आयोजित जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत मोठा पुतळा उभारण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या या महत्वकांक्षी प्रकल्पावर राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. आपल्या बूट, शर्टप्रमाणेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत मोठा पुतळा हा मेड इन चायना असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधी हे सध्या मध्य प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांची ‘राम पथ गमन यात्रा’ आज चित्रकूट येथे आली. त्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राफेल विमान व्यवहारावरुनही मोदी सरकारवर टीका केली. मोदींनी जुना करार मोडीत काढला. एचएएलकडून ते काम काढून अनिल अंबानींना देण्यात आला. मोदींनी देशाचा विश्वासघात केला आहे. ५३६ कोटींचे विमान मोदींनी १६०० कोटींना खरेदी केले आहे. आता ते अंबानींच्या खिशात ३० हजार कोटी रुपये टाकू इच्छितात. मी विचारलेल्या प्रश्नांना मोदी उत्तर देत नसल्याचे ते म्हणाले.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. कर्नाटकमध्ये आमची सत्ता आल्यानंतर दहा दिवसांत तेथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते, अशी माहिती त्यांनी दिली. मला तो दिवस पाहायचा आहे, जेव्हा चीनमधील युवक सेल्फी घेताना त्याच्या हातातील फोनवर ‘मेड इन चित्रकूट’ असे लिहिलेले असेल, असेही त्यांनी म्हटले.