भीषण महापुराचे संकट ओढवलेल्या केरळच्या नागरिकांची विचारपूस करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी केरळमध्ये दाखल झाले. परदेश दौऱ्यावरुन आज सकाळी परतल्यानंतर त्यांनी लगेच केरळकडे धाव घेतली. थिरुअनंतपुरम य़ेथून ते हेलिकॉप्टरने अलपुझा जिल्ह्यातील चेंगन्नूरला पोहोचले. दरम्यान, काही काळ त्यांनी आपले हेलिकॉप्टर येथे थांबवले आणि एका एअर अॅम्ब्युलन्सला पुढे जाण्यासाठी प्राधान्य दिले.


पूराचा फटका बसलेल्या भागांचा दौऱा करण्यासाठी राहुल गांधी यांनी चेंगन्नूर येथील हेलिपॅडवरून उड्डाण करणार होते. त्याचवेळी तेथून एका एअर अॅम्ब्युलन्सलाही जायचे होते. यावेळी राहुल यांनी स्वतःपेक्षा त्या अॅम्ब्युलन्सला पुढे जाण्यासाठी प्राधान्य दिले. त्यानंतर ते आपल्या हेलिकॉप्टरमधून पुढील दौऱ्यावर निघाले.

थिरुअनंतपुरम येथे पोहोचल्यानंतर पहिल्यांदा राहुल गांधी यांनी ख्रिच्शन कॉलेजच्या मदत छावणीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या मदत छावणीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत केरळचे विरोधीपक्ष नेते रमेश चेन्नितला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एम. एम. हसनही होते. यानंतर ते मच्छीमार आणि मदत छावण्यांमध्ये काम करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीही भेट घेणार आहेत.

केरळमध्ये २९ मे पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात ४७४ जणांचा मृत्यू झाला असून १५ लोक अद्याप बेपत्ता आहेत.