पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. या अंतर्गतच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे उदारवादी मुस्लीम विचारवंतांची भेट घेणार आहेत. ही मुलाखत आज सांयकाळी पाच वाजता होणार आहे. राहुल यांनी यापूर्वी दलित आणि मागासवर्गीयांच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून बोध घेत काँग्रेसला आगामी निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण रोखायचे आहे. त्यासाठी राहुल गांधींनी कट्टरपंथी ऐवजी उदारवादी आणि विद्वान समजल्या जाणाऱ्या मुस्लीम चेहऱ्यांची निवड केली आहे. यामध्ये शबनम हाश्मी, झोया हसन, जामिया मिलिया इस्लामियाच्या माजी कुलगुरू सईदा हामिदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष झेड.के. फैजान यांच्या नावाचा समावेश आहे.

या बैठकीचा अजेंडा ठरला नसल्याचे फैजान यांनी सांगितले. आम्हाला फक्त आमंत्रित करण्यात आले आहे. तिथे काय आणि कोणत्या मुद्यावर चर्चा होणार आहे, याची माहिती समजू शकलेली नाही. पण आम्ही तिथे मुस्लिमांच्या सद्यस्थितीबाबत काँग्रेससह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मौनावर आमची चिंता त्यांच्या कानावर घालू, असेही ते म्हणाले.

या बैठकीच्या माध्यमातून मुस्लीम समाजाला वेगळे होण्यापासून वाचवण्याचा राहुल यांचा प्रयत्न आहे. विशेषत: काँग्रेस ज्या पद्धतीने सौम्य हिंदुत्वाच्या वाटेवर जात आहे. त्यावरून मुस्लिमांना संदेश गेला आहे की, आता त्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे दुर्लक्ष होत आहे. या बैठकीच्या माध्यमातून मुस्लीम विचारवंतांचे मत जाणून घेण्याचाही काँग्रेसचा प्रयत्न आहे. या चर्चेतील मुद्दे राहुल हे निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही समावेश करू शकतात.

लोकसभा निवडणुकीपूर्वी या वर्षाअखेर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसारख्या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. अशात उदारवादी आणि विद्वान मुस्लीम चेहऱ्यांबरोबर होणाऱ्या राहुल यांच्या बैठकीकडे संपूर्ण मुस्लीम वर्गाची नजर आहे.

मुस्लीम विचारवंतांबरोबर होणाऱ्या बैठकीत इतिहासकार, लेखक, पत्रकार आणि विधी क्षेत्रासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही बैठक आयोजित करण्यामागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांची महत्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते.