गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवणाऱ्याचा किस्सा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात सांगितला होता. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कोट्यवधी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिलेल्या पंतप्रधान मोदींची रोजगार नीती ही आता गटारात पाइप लावून त्यातून निघणाऱ्या गॅसवर पकोडे तळण्याची असल्याचा टोला त्यांनी लगावला.

कर्नाटकातील बीदर येथे एका सभेत राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ही नरेंद्र मोदींची देशासाठीची रोजगार रणनीती आहे. गटारात पाइप लावा आणि पकोडे बनवा. दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे वचन देणारे आता म्हणत आहेत की, तुम्ही पकोडे बनवा आम्ही गॅस देणार नाही.

गटारातून निघालेल्या गॅसच्या माध्यमातून ते युवकांना रोजगार देण्याबाबत आता सांगत आहेत. मोदींचे व्हिजन हे फक्त देशातील १५ ते २० लोकांना फायदा देण्याचे असून देशातील युवकांना पकोडे बनवायला सांगायचे. मोदी हे भारताचे पंतप्रधान नाहीत तर फक्त ठराविक १५ ते २० लोकांचेच पंतप्रधान आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींनी वचन दिले होते की, सर्वांच्या बँक खात्यात १५ लाख रूपये टाकले जातील. पण दहा रूपयेही कोणाला मिळाले नाहीत. या उलट काँग्रेसने आश्वासन दिले होते की, सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफ करेन. सत्तेवर येताच दिलेल्या शब्दाप्रमाणे ३१ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी

मोदींनी १० ऑगस्ट रोजी जागतिक जैव इंधन दिनानिमित्त आयोजित एका चहावाल्याचा किस्सा सांगितला होता. एका शहरात एक व्यक्ती चहा विकतो. त्या व्यक्तीच्या दुकानाच्या बाजूने एक गटार वाहते. त्या चहावाल्याने एका छोटं भांडं उलटं करून गटारावर ठेवले आणि गटारातून जो गॅस निघतो त्यातून तो चहा बनवतो, असे मोदींनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राहुल यांनी समाचार घेतला.