देशात काही ठिकाणी निर्माण झालेल्या चलन तुटवड्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचे वाटोळं केल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. नीरव मोदी ३० हजार कोटी रूपये घेऊन देशातून पळून गेला. पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत. आमचे पंतप्रधान संसदेत उभे राहण्यास घाबरतात. आम्हाला भाषणासाठी १५ मिनिटे द्या, मग पंतप्रधान संसदेत कधीच उभे राहू शकणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी मोदींना आव्हान दिले.

राहुल गांधी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांनी त्यांनी देशातील चलन तुटवड्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर अत्यंत आक्रमकपणे त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर हल्ला केला. पंतप्रधान संसदेत उभे राहण्यास घाबरतात. आम्हाला भाषणासाठी फक्त १५ मिनिटं मिळायला हवीत मग पाहा पंतप्रधान संसदेत कधीच उभे राहू शकणार नाहीत. मग ते राफेलचे प्रकरण असो किंवा नीरव मोदीचे प्रकरण पंतप्रधान उभेच राहू शकणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.

मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचं वाटोळं केलं आहे. तिकडे नीरव मोदी ३० हजार कोटी रूपये घेऊन पळून गेला. त्यावर ते काहीच बोलत नाहीत. आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगते उभे केले जाते. आपल्या खिशातून ५००-१००० रूपयांच्या नोटा काढल्या आणि त्या नीरव मोदीच्या खिशात कोंबल्या, असा आरोप त्यांनी केला. मोदींनी म्हटले होते की अच्छे दिन येतील, पण कोणाचे आले. फक्त १५ लोकांचे अच्छे दिन आले आहेत. गरीब, मजूर, सामान्य लोकांचे बुरे दिनच आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकांना आश्वस्त करत बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण परिस्थितीची समीक्षा केली आहे. देशात चलन तुटवडा नाही. फक्त काही ठिकाणी अचानक मागणी वाढल्यामुळे अडचणी आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँकेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातील लोकांकडून आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे काढण्यात आल्यामुळे हे संकट निर्माण झाले आहे.