काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अद्याप आपला पुढील निर्णय जाहीर केला नसून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांनी आपला उत्तराधिकारी आपण नाही तर पक्ष निवडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पत्रकारांनी राहुल गांधी यांना तुमचा उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं की, ‘उत्तराधिकारी कोण असेल याचा निर्णय आपण घेणार नाही आहोत’. यावेळी राहुल गांधी यांना राफेल लढाऊ विमान खरेदीत चोरी झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या अभिभाषणात राफेलचा उल्लेख केल्याबद्दल विचारण्यात आलं असता राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीत चोरी झाल्याचं म्हटलं. राफेल लढाऊ विमान खरेदीत चोरी झाल्याचा आरोपावर मी ठाम आहे असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. राहुल गांधी यांनी नेहमीच राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने मात्र यामध्ये कोणताही घोटाळा झाला नसल्याचं सांगितलं होतं.