मेघालय निवडणुकीच्या काही दिवस आधी शिलाँगला पोहोचलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सुमारे ७० हजार रूपये किंमतीचे जॅकेट परिधान करून पक्षाच्या एका संगीत कार्यक्रमात हजेरी लावली. गतवर्षी उत्तराखंड निवडणुकीच्या प्रचारावेळी एका सभेत आपला फाटलेला खिसा दाखवणाऱ्या राहुल गांधींनी इतका महाग जॅकेट घालण्यावरून भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजपाच्या मेघालय शाखेने मंगळवारी ट्विट करत राहुल गांधींच्या जॅकेटवर निशाणा साधला. व्यापक भ्रष्ट्राचार करून मेघालयचा सरकारी खजिना लुटल्यानंतर काळ्या पैशातून बनलेले सुटा-बुटाचे सरकार ? आमच्या दु:खावर गाणे गाण्याऐवजी तुम्ही मेघालयच्या नाकर्त्या सरकारचे प्रगती पुस्तक देऊ शकला असता. तुमची उदासीनता आमची थट्टा उडवत आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटनंतर भाजपाने जॅकेटचा फोटो आणि त्याची किंमतही पोस्ट केली आहे. हे जॅकेट ब्रिटिश लक्जरी फॅशन ब्रँड बरबरी कंपनीचे आहे. ब्लूमिंगडेल्सच्या वेबसाइटच्या मते, या जॅकेटची किंमत ही ६८,१४५ रूपये आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी सुटा-बुटाचे सरकार असा आरोप केला होता. भाजपाने या ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधींना उत्तर दिल्याचे सांगण्यात येते.

वर्ष २०१५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबरील भेटीवेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नावाचा सूट परिधान केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्यावर मोठी टीका केली होती. त्यानंतर या सूटचा लिलाव झाला. या सूटला लिलावात ४ कोटी ३१ लाख रूपये मिळाले.

दरम्यान, शिलाँग येथे आयोजित या संगीत कार्यक्रमाचा राहुल गांधींसह चार हजार लोकांनी आनंद घेतला. मागील १५ वर्षांपासून काँग्रेसची इथे सत्ता आहे. मेघालयमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान आहे.