पुलवामासारखा हल्ला ही रोज घडणारी घटना आहे असे काँग्रेसला वाटते का? असा प्रश्न विचारत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही अमित शाह यांनी टीका केली आहे. राहुल गांधी भारतीय वायुदलावर संशय घेणारे आहेत कोण? एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे कसे करू शकतो असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला आहे. जेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारताच्या विरोधात नारेबाजी होते तेव्हा काँग्रेस त्या गोष्टीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा देते आणि पुलवामा सारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअर स्ट्राईकने उत्तर दिले जाते तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही किती दुर्दैवी घटना आहे असे अमित शाह यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर अमित शाह यांनी सॅम पित्रोदांवरही निशाणा साधला आहे. सॅम पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकबाबत केलेलं वक्तव्य चिंताजनक आहे. सॅम पित्रोदा असोत किंवा काँग्रेस त्यांना असे वाटते आहे का लष्कर आणि पाकिस्तान सरकार यांच्यात हल्ल्यासंदर्भात काही संबंध आहे? असा संबंध जर असेल तर दोष कुणाचा आहे? याचं उत्तर काँग्रेसने द्यावं असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

१४ फेब्रुवारीला पुलवामा या ठिकाणी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर या घटनेचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोट या ठिकाणी एअर स्ट्राईक करून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. या एअर स्ट्राईकचे सुरुवातीला कौतुक झाले त्यानंतर मात्र विरोधक पुरावे मागत आहेत. दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवा अशी मागणी करत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या आरोपांना अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.