News Flash

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रूग्णालयात दाखल

आरोग्याच्या समस्यांमुळे त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

Congress President Sonia Gandhi : यापूर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेसमधील अंतर्गत निवडणुकांची (संघटनेतील निवडणूक) मुदत सहा महिन्यांनी वाढवली होती. त्यानुसार काँग्रेसला ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत पक्षांतर्गत निवडणूक घ्यावी लागेल.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी दुपारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया गांधी यांना ताप आला आहे. त्यांच्यावर सध्या सर गंगाराम रूग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांवर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये वाराणसीमधील प्रचारयात्रेदरम्यान त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर साधारण दोन महिने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर सातत्याने त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू आहेत. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही सोनिया यांना उपस्थित राहता आले नव्हते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पुढील वर्षीच्या पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांनंतर आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आरोग्याच्या समस्यांमुळे त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’ला सांगितले होते.

प्रकृती अस्वास्थामुळे त्या निवडणुकांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा देणार होत्या. मात्र, पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपर्यंत तरी सोनिया गांधींनी अध्यक्षपदावर कायम राहावं, अशी इच्छा पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बोलून दाखवली. १ फेब्रुवारी २०१७ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे. या निवडणुकांत पक्षाची ताकद दाखवून देण्याची संधी आहे, असेही सूत्रांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत सोनिया गांधींची अध्यक्षपदी फेरनिवड झाली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्या आपल्या पदाचा कार्यकाळही पूर्ण करू शकत नाहीत. या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर लगेच त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.

सोनिया गांधी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. ते पक्षाध्यक्ष व्हावेत, अशी इच्छा त्यांच्या पक्षातील तरुण नेत्यांची आहे. त्यांची ही इच्छा या दोन राज्यांतील निवडणुकांनंतरच पूर्ण होईल. मध्यंतरी सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांनी पक्षात सक्रिय होतील, अशी चर्चा होती. मात्र, २०१९ मध्येच त्यांचा राजकारणात खऱ्या अर्थाने प्रवेश होईल. २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक त्या सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून लढतील, असेही सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:00 pm

Web Title: congress president sonia gandhi admitted to hospital for viral fever
Next Stories
1 नागरोटा येथे दहशतवाद्यांशी लढताना नांदेडच्या संभाजी कदम यांना वीरमरण
2 आयएएस टॉपर टीना दाबी-अतहर खानचे लग्न म्हणजे ‘लव्ह जिहाद’- हिंदू महासभा
3 सांबा सेक्टरमध्ये तीन तर नागरोटा येथे चार दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X