भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अकाली निधनाबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अरुण जेटली यांनी सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान कायमस्वरुपी लक्षात राहिल असे सोनिया गांधी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. त्यांनी दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. 9 ऑगस्टपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्या खांद्यावर अर्थमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती. परंतु त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता. शिवाय, ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील 18 महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये, असेही ते म्हणाले होते.