गरीबांना सप्टेंबर महिन्यातपर्यंत मोफत धान्य पुरवा अशी विनंती करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. देशात लॉकडाउन सुरु केल्यापासून गरीबांचे, स्थलांतरीत मजुरांचे आणि हातावर पोट असलेल्या प्रत्येकाचे हाल होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या आणखी तीन महिन्याच्या कालावधीत म्हणजेच सप्टेंबर २०२० च्या शेवटापर्यंत गरीबांना धान्य मोफत द्यावं अशी विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

काय म्हटलं आहे सोनिया गांधी यांनी?
मागील तीन महिन्यात लॉकडाउनची कठोर अमलबजावणी देशभरात करण्यात आली. या काळात लाखो गरीबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. तसेच अनेक लोक दारिद्र्याच्या गर्तेत ढकलले गेले. अशात गरीबांच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना धान्य उपलब्ध करुन देण्यात आलं. ते पुढे आणखी तीन महिने उपलब्ध करुन देण्यात आलं पाहिजे अशी विनंती मी आपणला या पत्राद्वारे करते आहे असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

अंत्योदय अन्न योजने अंतर्गत गरीबांना ५ किलो धान्य हे प्रतिमहिना उपलब्ध करुन द्यावं. सप्टेंबर २०२० पर्यंत ही तरतूद पुढे न्यावी असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

लाखो भारतीयांवर दारिद्र्याच्या गर्तेत जाण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भाग असो की शहरी भाग त्या ठिकाणी असलेल्या गरीबांना पुढील तीन महिने धान्य मोफत मिळालं पाहिजे. माझ्या या विनंतीवर आपण लवकरात लवकर विचार कराल आणि यासंबंधीची घोषणा कराल अशी आशा मला आहे असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.