दिल्लीत सुरु असलेला हिंसाचार अजून पूर्णपणे थांबलेला नाही. परिस्थिती अजून नियंत्रणात आलेली नसताना, देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांना आता भाजपाने उत्तर दिले आहे.

दिल्लीतील सध्याच्या परिस्थितीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. या आरोपाला केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिले आहे.

अमित शाह कुठे आहेत म्हणून ते विचारतात? त्यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यावेळी काँग्रेसचे नेते सुद्धा तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी पोलिसांना निर्देश दिले व त्यांचे मनोधैर्यही वाढवले. काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्याचा पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होत आहे असे प्रकाश जावडेकर म्हणाले.

आणखी वाचा – दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे वक्तव्य दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. खरंतर या प्रसंगी सर्व पक्षांनी शांतता प्रस्थापित करण्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, पण उलट तेच वाईट राजकारण करुन सरकारला जबाबदार ठरवत आहेत. हिंसाचाराचे राजकारण करणे चुकीचे आहे असे जावडेकर म्हणाले.

आणखी वाचा – दिल्लीच्या हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी सोडले मौन

मोदींनी काय केलं आवाहन
दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

पंतप्रधान म्हणाले, “शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत रहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्वाचं आहे.”