राफेल कराराबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जे बोलत आहेत ते धादांत खोटे आहे. त्यांच्या आरोपांना काहीही अर्थ नाही त्यांनी खोटे बोलणे सोडावे आणि पसरवणेही सोडावे असे म्हणत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधींवर टीका केली. राफेल कराराबाबत राहुल गांधी सातत्याने खोटं बोलत आहेत. त्यांची वक्तव्येही अगदी सारखीच आहेत. त्यांनी हा खोटेपणा सोडावा असेही गोयल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी हे ‘सीरियल लायर’ आहेत असेही पियुष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे मोदी सरकारवर टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे ते राफेल करारावरून सातत्याने खोटं बोलून टीका करत आहेत. राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरत आहेत मर्यादा सोडून टीका करत आहेत. ही बाब चुकीची आहे असंही गोयल यांनी म्हटलं आहे.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या फ्रान्स दौऱ्यावरही राहुल गांधी यांनी टीका केली. ते अर्धवट माहितीच्या आधारे बोलत आहेत. त्यांच्या टीकेला काहीही अर्थ नाही असेही पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

दिल्लीत गुरुवारी राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अनिल अंबानींचे पंतप्रधान आहेत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या १० दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तीच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले या सगळ्या आरोपांनंतर राहुल गांधींच्या आरोपांना पियुष गोयल यांनी उत्तर दिले आहे.