News Flash

काँग्रेस कार्यकारिणीत खडाजंगी

राहुल गांधी यांची मध्यस्थी; अध्यक्षपद निवडणूक जूनअखेर!

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निष्ठावान आणि बंडखोर काँग्रेस नेत्यांमध्ये शुक्रवारी कार्यकारणीच्या बैठकीत खडाजंगी झाली. अखेर वाद विकोपाला जाऊ नये म्हणून राहुल गांधींनी मध्यस्थी केल्याचे वृत्त आहे. अशा गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जूनअखेर निवडणुकीद्वारे पक्षाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला.

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेसने त्याकडे आधी लक्ष देण्याची गरज असल्याचा युक्तिवाद राहुल यांच्या निष्ठावानांनी केला. पक्षाच्या निवडणूक समितीने मेअखेपर्यंत पक्षाध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे तो महिनाभर पुढे ढकलण्यास कार्यकारिणी सदस्यांनी सहमती दिल्याने जूनअखेपर्यंत पक्षाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गेली दोन वर्षे काँग्रेसमध्ये पक्षनेतृत्वाच्या मुद्दय़ावरून कलह सुरू आहे. कार्यकर्त्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध असलेले नेतृत्व पाहिजे आणि पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जाव्यात या प्रमुख मागण्यांसह २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. त्यानंतर राहुल गांधी यांचे निष्ठावान आणि या ज्येष्ठ नेत्यांमधील मतभेदाची दरी वाढू लागली आहे.

दूरचित्रसंवाद माध्यमाद्वारे झालेल्या कार्यकारणीत राहुल गांधी यांनी, ‘‘सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा महत्त्वाचा असून त्याकडे पक्षाने लक्ष द्यावे’’, असे मत मांडल्याचे समजते. पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असली तरी राहुल यांनी अजूनही पक्षातील सर्वोच्चपद स्वीकारण्याबाबत अनुकूलता दाखवलेली नाही. पक्षातील निर्णय मात्र स्वत: राहुल घेत असल्याने पक्षात दोन शक्तिस्थाने निर्माण झाली असून पक्षनेतृत्वासंदर्भात कायमस्वरूपी निर्णय घेण्याची मागणी ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे.

कार्यकारी समिती निवडणुकीबाबत टाळाटाळ

– काँग्रेसमधील पक्षांतर्गत निवडणुकीचा विषय चव्हाटय़ावर येतो, अन्य पक्षांत मात्र तसे होत नाही. भाजपमध्ये कधी पक्षांतर्गत निवडणुकीवर जाहीरपणे चर्चा होते का? पहिल्यांदा विधानसभा निवडणुका, मग पक्षांतर्गत निवडणुका होतील, असे गांधी निष्ठावानांनी ज्येष्ठ नेत्यांना सांगितले.

– पक्षाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जाऊ  शकतात. यासंदर्भात अंतिम निर्णय हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी घेतील. काँग्रेसच्या घटनेप्रमाणे निवडणुका घेतल्या जातील, असा दावा वेणुगोपाल यांनी केला.

– कार्यकारिणी समितीच्या (सीडब्लूसी) निवडणुका कधी होतील यावर वेणुगोपाल तसेच, राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मौन बाळगले. यापूर्वी १९९७ मध्ये कार्यकारिणी समितीचे सदस्य निवडणुकीद्वारे नियुक्त झाले होते.

– गेल्या महिन्यात सोनिया गांधी यांच्या ‘१० जनपथ’ या निवासस्थानी बंडखोर नेत्यांशी झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी संसदीय मंडळासाठी देखील निवडणूक घेण्याचा मुद्दा मांडला होता.

वादास कारण..

कार्यकारिणीच्या बैठकीला ‘बंडखोर पत्रलेखक’ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक यांच्यासह त्यांचे समर्थक पी. चिदम्बरम आदी उपस्थित होते. या नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुकीवर चर्चा करण्याची मागणी केली.

पक्षाध्यक्षपदाबरोबरच कार्यकारी समितीचीही निवडणूक घेण्याची मागणी ज्येष्ठ नेत्यांनी गेल्या ऑगस्टमध्ये सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मात्र, अशोक गेहलोत, कॅ. अमिरदर सिंग तसेच अन्य राहुल निष्ठावानांनी बंडखोरांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे समजते.

पक्षांतर्गत निवडणुकीचा विषय वारंवार का काढला जातो? तुमचा पक्षनेतृत्वावर विश्वास नाही का? सद्य:स्थितीत विधानसभेच्या निवडणुका तसेच शेतकऱ्यांचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. त्यावर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा युक्तिवाद गेहलोत यांनी केल्यानंतर बंडखोर नेत्यांनी नमते घेतल्याचे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:01 am

Web Title: congress presidential election by the end of june abn 97
Next Stories
1 पुन्हा एकदा नोटबंदी? आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु
2 धक्कादायक! गावकऱ्यांनी फेकलेला जळता टायर हत्तीच्या कानात अडकला आणि त्यानंतर…
3 “हा तर आमचा अपमान, ट्रॅक्टर मोर्चा काढणारच,” कृषीमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांचा संताप
Just Now!
X