उत्तर प्रदेशात गुंडांनी केलेल्या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोबतच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे अशा शब्दांत टीकाही केली आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आरोपीला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करते. उत्तर प्रदेशातील कायदा आण आणु सुव्यवस्था खालावली आहे. गुन्हेगारांची भीती संपली आहे”.

“सर्वसामान्य जनता आणि पोलीसदेखील सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. इतक्या गंभीर घटनेनंतर त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये अजिबात हलगर्जीपणा नको,” असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- युपीमध्ये चकमकीदरम्यान पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार, उपअधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षकाचाही समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही चकमक उडाली. विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेली असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

, पोलिसांचं पथक विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्या जवळ पोहोचणार इतक्यात इमारतीवरुन पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद झालेल्या पोलिसांसाठी शोक व्यक्त केला आहे. सोबतच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.