देशात करोनाचं संकट आ वासून उभं आहे. दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला असून जुलै-ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेची देखील शक्यता वर्तवली जात आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनचे कठोर निर्बंध देखील लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजेसच्या परीक्षांचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. करोनाचं मोठं संकट बाहेर असताना आणि घरा-घरातही करोना रुग्णांमुळे तणाव निर्माण झालेला असताना अशा परिस्थितीत परीक्षा घ्यायला हव्यात की नाहीत? यावर मोठी चर्चा सुरू झालेली असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. तसेच, परीक्षा घेण्यामागचं नेमकं कारणच मला कळत नाहीये, असं प्रियांका गांधींनी म्हटलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रियांका गांधी यांनी परीक्षांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर तोंडसुख घेतलं आहे.

आपण धडा का नाही घेत आहोत?

आपल्या ट्वीटमध्ये प्रियांका गांधी यांनी सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांविषयीचा मुद्दा उपस्थित केला आहे. “सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे की या परीक्षा ऐन करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घेतल्या जात आहेत. त्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. आपण धडा का घेत नाही आहोत? बंद जागांमध्ये एकत्र येण्यामुळे कोविडचा प्रसार होतो. दुसऱ्या लाटेनं मुलांना करोनाच्या नव्या विषाणूची लागण लवकर होऊ शकते हे दाखवून दिलं आहे”, असं प्रियांका गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

हे असंवेदनशील आणि अन्यायकारक आहे!

आपल्या ट्वीटमध्ये प्रियांका गांधी पुढे म्हणतात, “करोनामुळे विद्यार्थी आधीच प्रचंड तणावामध्ये आहेत. त्यात त्यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी घालून परीक्षा हॉलमध्ये बसण्याची अपेक्षा करणं हे असंवेदनशील आणि अन्यायकारक आहे. त्यातल्या अनेकांच्या कुटुंबातील व्यक्तींना करोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. ते आधीच खूप साऱ्या तणावात आहेत. अनेक महिने निर्णय घेणं लांबवल्यानंतर या परीक्षा अशा काळात घेण्यामागचं कारण मला समजत नाहीये”.

 

आता वेळ आली आहे की आपल्या शिक्षणव्यवस्थेने…!

दरम्यान, या ट्विट्समध्ये प्रियांका गांधी यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. “मी याआधीही हे सांगितलं आहे आणि आत्ता पुन्हा एकदा सांगते. मुलांचं मानसिक आरोग्य हे त्यांच्या शारिरीक आरोग्याइतकंच महत्त्वाचं आहे. आता वेळ आली आहे की आपल्या शिक्षणव्यवस्थेने मुलांच्या भल्याकडे संवेदनशील दृष्टीने बघायला हवं आणि या समस्या गांभीर्याने घ्यायला हव्यात”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ताशेरे ओढले होते. “परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कसे करू शकता? करोनाचे कारण पुढे करून दहावीसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षाची परीक्षा रद्द कशी केली जाऊ शकते? बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का?” असे सवाल न्यायालयाने उपस्थित केले होते. यासंदर्भात राज्य सरकार परीक्षांबाबत नवीन धोरण ठरवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे केंद्रीय पातळीवर सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षांबाबत बैठका सुरू आहेत.