काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आर्थिक विकास दराच्या घरणीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्या भाजपानेच अर्थव्यवस्था पंक्चर केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच अर्थव्यवस्थेच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

देशाच्या विकास दराच्या घसरणीवरून अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था दिसून येत आहे. आर्थिक विकास दरात वाढ नाही, रूपयाचे मूल्यही घसरत आहे तर रोजगारही गायब आहेत, अशा आशयाचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे. तसेच अर्थव्यवस्थेच्या बिकट अवस्थेसाठी जबाबदार कोण आहे हे आतातरी स्पष्ट करा, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

वित्तीय वर्ष २०१९-२० मधील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील देशाचा विकास दर (सकल राष्ट्रीय उत्पादन) ५ टक्क्यांवर स्थिरावताना सहा वर्षांच्या किमान स्तरावर येऊन ठेपला आहे. निर्मिती आणि कृषी क्षेत्रातील संथ हालचालीमुळे दरवाढीला आळा बसला आहे. यापूर्वी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन किमान ४.३ टक्के अशा प्रमाणात जानेवारी ते मार्च २०१३ दरम्यान नोंदले गेले होते. यंदाचा दर वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील तब्बल ८ टक्क्यांच्या तुलनेत थेट ३ टक्क्यांनी खालावला आहे.

गेल्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वीच्या १२.१ टक्क्यांवरून यंदा अगदीच ०.६ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. तर कृषी क्षेत्राचा प्रवास ५.१ टक्क्यांवरून वार्षिक तुलनेत निम्म्यापेक्षा कमी, २ टक्क्यांवर राहिला आहे. देशातील बांधकाम क्षेत्र ९.६ टक्क्यांपुढे यंदा ५.७ टक्क्याने विकसित झाले आहे. तर खनिकर्म क्षेत्राची वाढ शून्याच्या काठावरून यंदा २.७ टक्क्यांपर्यंत उंचावली आहे. विकास दर आधीच्या तिमाहीत ५.८ टक्के होता. तर गेल्या एकूण वित्तीय वर्षांत त्याने ६.८ टक्के असा गेल्या पाच वर्षांचा किमान स्तर अनुभवला आहे.