सध्या राफेल मुद्दा काँग्रेस पक्षाने उचलून धरला आहे. सणासुदीच्या दिवसातही राफेल मुद्दा चर्चेत रहावा, जनतेचे लक्ष त्यावरुन हटू नये असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुर्गा पूजेच्या निमित्ताने बिहारमधील काँग्रेस नेत्यांनी एक लक्ष वेधून घेणारे पोस्टर लावले आहे. जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांधलेल्या ३५ विमानतळाची नावे सांगेल ? तसेच फ्रान्सबरोबर राफेल करार नेमक्या किती किंमतीला झाला ? जो कोणी या प्रश्नांची अचूक उत्तरे देईल त्यांना पाच कोटी रुपयांचे इनाम देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

सिद्धार्थ क्षत्रिय आणि वेंकटेश रमन या दोन काँग्रेस नेत्यांनी ही पोस्टर लावली आहेत. या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल विमानावर बसल्याचे दाखवण्यात आले आहे तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा सुद्धा फोटो आहे. राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या वादग्रस्त पोस्टरकडे दुर्लक्ष करण्याच भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष मदत मोहन झा यांनी आपल्याला या पोस्टरबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

कोणीही पोस्टर लावली ? कोण पाच कोटी रुपये देणार ? मला याबद्दल काहीही माहिती नाही. मी याबद्दल माहिती घेऊन तुमच्याशी बोलेन असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.

राहुल गांधीच ही पूजा धमाका ऑफर जिंकू शकतात असे भाजपाने सांगितले. राफेल व्यवहाराबद्दलचा सर्व संशय दूर झाला असून केंद्राने विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत असे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील मोदी यांनी सांगितले.