काँग्रेसने भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी 1800 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीला वाटले असल्याच्या रिपोर्टवरुन आक्रमक भूमिका घेत टीका केली आहे. येडियुरप्पा यांनी यासंबंधी स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. द कॅरावानने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसने हे आरोप केले आहेत. न्यूज रिपोर्टमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप करत उत्तराची मागणी केली आहे.

द कॅरावानने आपल्याकडे एक डायरी असल्याचा दावा केला आहे. या डायरीत येडियुरप्पा यांनी काही नोंदी केल्या असून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना जवळपास 1800 कोटी रुपये वाटल्याचा दावा केला आहे. भाजपा नेत्यांच्या यादीत अरुण जेटली, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांचं नाव असून काही न्यायाधीश आणि वकिलांचीही नावे आहेत.

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी न्यूज रिपोर्ट सादर करत भाजपाने हे आरोप खरे आहेत की खोटे यासंबंधी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान भाजपाकडून अद्याप यासंबंधी कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. ‘हा रिपोर्ट खरा आहे की खोटा ? येडियुरप्पा यांची स्वाक्षरी असणारी डायरी 2017 पासून आयकर विभागाकडे आहे. असं असेल तर मग नरेंद्र मोदी आणि भाजपाची चौकशी का झाली नाही ?’, असा प्रश्न रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला.

रणदीप सुरजेवाला यांनी येडियुरप्पा यांनी दिलेल्या पैशांमुळे कोणाचा फायदा झाला त्यांची नावं उघड कऱण्याची मागणीही केली आहे. ‘नव्याने गठीत करण्यात आलेल्या लोकपालकडून चौकशी कऱण्यासाठी हे योग्य प्रकरण आहे’, असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं.

काँग्रेसचे सर्व आरोप खोटे –

येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘काँग्रेस पक्षाकडे कोणत्याही नवीन कल्पना नसून मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांची चिडचिड होत आहे. युद्ध सुरु होण्याआधीच काँग्रेसचा पराभव झाला आहे. आयकर विभागाने आधीच सर्व कागदपत्रं खोटी असल्याचं सांगितलं आहे’, अशी माहिती येडियुरप्पा यांनी दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा मिळावा यासाठी काँग्रेसने हा रिपोर्ट पेरला आहे. काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे खोटे आणि संदर्भ नसलेले आहेत. संबंधित व्यक्तीवर मानहानीचा दावा ठोकण्यासाठी मी माझ्या वकिलांशी चर्चा करत आहे असंही येडियुरप्पा यांनी सांगितलं आहे.