काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरातमधील सूरत येथील दंडाधिकारी कोर्टात हजर झाले आहेत. मोदी आडनावावरुन राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. भाजपा आमदाराने हा खटला दाखल केला असून याचप्रकरणी राहुल गांधी जबाब नोंदण्यासाठी कोर्टात हजर झाले आहेत.

भाजपा आमदार पुर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या खटल्यावरील सुनावणीदरम्यान सूरतच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्यांचा अंतिम जबाब नोंदवण्याचा आदेश दिला होता. दरम्यान कोर्टात हजर होण्याच्या काही तास आधी राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी, “अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य कोणतीही भीती न बाळगणे आहे”, असं म्हटलं होतं.

पुर्णेश मोदी यांनी एप्रिल २०१९ मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, राहुल गांधी निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी करत आहेत. राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ मध्ये कर्नाटकमधील सभेत केलेल्य्या वक्तव्याच्या आधारे ही तक्रार करण्यात आली होती.

“नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं सारखं आडनाव कसं काय? सर्व चोरांचा मोदी हेच आडनाव कसं काय आहे?,” असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यावेळी राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मे महिन्यात त्यांनी अध्यक्षपद सोडलं होतं.

नीरव मोदी आणि ललित मोदी घोटाळा करुन देशातून फरार झाले आहेत. दरम्यान राहुल गांधी याआधी ऑक्टोबर २०१९ मध्ये कोर्टात हजर झाले होते. यावेळी त्यांनी आपण दोषी नसल्याचं म्हटलं होतं. काँग्रेसने ही खोटी तक्रार असल्याची टीका केली आहे.