कर्नाटकात सध्या सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सत्तेसाठी भाजपाकडून पैशांचा वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सध्या कर्नाटकात राजकीय नाट्य सुरू असून हे प्रकरण आता न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले आहे.

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या आणि कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षांच्या याचिकांवर सुनावणी करताना मंगळवारपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षांना मंगळवारपर्यंत आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यास वेळ दिला आहे. तत्पूर्वी कोर्टाने गुरुवारी विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या राजीनाम्यावर त्याच दिवशी निर्णय घेण्यास सांगितले होते. याचिकेद्वारे कर्नाटकच्या १० बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली की, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमचे राजीनामे स्वीकारण्याचे निर्देश द्यावेत. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी आमदारांविरोधात अयोग्यता याचिकेचा हवाला देताना राजीनाम्यांवर निर्णयासाठी अधिक वेळेची मागणी केली होती.

यावर आता प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांनी राज्यातील सत्तांसाठी भाजपा पैशाचा वापर करत आहे. आम्ही पूर्वेकडील राज्यांमध्येही भाजपाचा हाच प्रकार पाहिला असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.