काँग्रेससोबत असलेले गेल्या १८ वर्षांतील संबंध तोडत ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. राहुल गांधींचे निकटवर्तीय असणाऱ्या नेत्यांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश होता. पण पक्षात होणारी घुसमट सहन न झाल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या राहुल गांधींनी ट्विटवर एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो १३ डिसेंबर २०१८ रोजीचा आहे. हा फोटो राहुल गांधींनी रिट्विट केला आहे. पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या फोटोमध्ये राहुल गांधी ज्योतिरादित्य शिंदे आणि कलमनाथ यांच्यासोबत उभे असल्याचं दिसत आहे. यावेळी त्यांनी संयम आणि वेळ दोन सर्वात शक्तिशाली योद्धा आहेत हे लिओ टॉलस्टॉय यांचं वाक्य लिहिलं आहेत.

१५ महिन्यांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या फोटोमधील आणि आत्ताची परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी आहे. राहुल गांधी आता पक्षाचे अध्यक्ष राहिलेले नाहीत, तर फोटोमधील त्यांचा एक सहकारी त्यांना सोडून गेला आहे. बुधवारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं.

आणखी वाचा- ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यावर अखेर सचिन पायलट बोलले

ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. “आयुष्यात नव्या आव्हानांचा सामना करण्याचा मी निर्णय घेतला आहे. जनसेवा हेच आपलं ध्येय असलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. राजकारण ही जनसेवा करण्याचा एक मार्ग असला पाहिजे. गेल्या १८ वर्षात मी श्रद्धेने कार्य केलं. काँग्रेस सोडताना मन दु:खी आहे. जनसेवा करण्याचं ध्येय काँग्रेसकडून होताना दिसत नाही. काँग्रेस पक्ष पहिल्यासारखा राहिलेला नाही. काँग्रेस वास्तव स्विकारत नाही आहे. नवे विचार, नव्या नेतृत्ताला मान्यता दिली जात नाही,” अशी टीका यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली.