पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. वर्षपूर्ती झाल्यानंतर भाजपानं राज्यांराज्यात व्हर्च्युअली रॅली आयोजित केल्या आहेत. भाजपाकडून आयोजिक केल्या जात असलेल्या रॅलीवर विरोधकांकडून टीका होत असून, राजदनंतर काँग्रेसनंही टीका केली आहे.

केंद्र सरकारनं केलेली कामं देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपानं व्हर्च्युअल रॅली आयोजित केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये, तर राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात व्हर्च्युअल रॅली घेतली आहे. भाजपाकडून आयोजित करण्यात येत असलेल्या व्हर्च्युअल रॅलींवर काँग्रेसनं टीका केली आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी काही प्रश्न भाजपाला विचारले आहेत.

अहमद पटेल यांनी व्हर्च्युअल रॅलींबद्दल एक ट्विट केलं आहे. “या तथाकथित व्हर्च्युअल रॅली करोनाच्या प्रसाराला नियंत्रित करणार आहे का? गेलेला रोजगार परत आणणार आहे का? गरिबांना जेवण देणार आहे का? अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित करणार आहे का?,” असे प्रश्न अहमद पटेल यांनी भाजपाला विचारले आहेत.

आणखी वाचा- कमल न तोड़ ले ये हाथ कहीं …; शशी थरूर यांचा राजनाथ सिंग यांना टोला

राजदचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही भाजपावर टीका केली होती. “प्रसारासाठी एका एलइडीचा खर्च सरासरी २०,००० इतका आहे. रॅलीमध्ये ७२ हजार एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या म्हणजे तब्बल १४४ कोटी रूपये फक्त एलईडी स्क्रीनवर खर्च करण्यात आले. श्रमिक एक्स्प्रेसच्या भाड्यापोटी झालेले ६०० कोटी देण्यासाठी ना सरकार समोर आलं, ना भाजपा. यांची प्राथमिकता गरीब नाही, तर निवडणूक आहे,” असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला होता.

आणखी वाचा- राहुल गांधींना शायराना अंदाजात उत्तर देण्याच्या प्रयत्नात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून झाली चूक

गुजरातमध्ये राजकारण तापलं

देशभरात भाजपाच्या व्हर्च्युअल रॅली सुरू असताना, सध्या गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत आठ काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले असून, काँग्रेसची दुसरी जागा धोक्यात आली आहे. तर भाजपानं तीन उमेदवार दिले असून, तिसरी जागा जिंकण्याची शक्यताही वाढली आहे.