गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षावरून काँग्रेसनं भाजपाला लक्ष्य केलं. काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना भाजपानंही राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून मिळालेल्या देणगीचा विषय समोर आणला. तसेच काँग्रेसनं चीनकडून लाच घेतल्याचा आरोपही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला होता. सीमेवरील तणावावरून दोन्ही पक्षात सुरू झालेला वाद आता पक्षांच्या चीनसोबतच्या संबंधांपर्यंत येऊन ठेपला आहे. भाजपानं केलेल्या आरोपांनंतर काँग्रेसनं नितीन गडकरी यांनी केलेल्या चीन दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत १५ जून रोजी रात्री दोन्ही सैन्य दलांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर काँग्रेसनं हा संघर्षाचा मुद्दा लावून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे सत्र सुरू केलं. काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर थेट चीनकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता.

भाजपाकडून झालेल्या आरोपांना काँग्रेसनं नितीन गडकरी यांनी केलेल्या चीन दौऱ्याचा उल्लेख करत टीका केली आहे. “चीनमधील सीसीपी पार्टीनं दिलेल्या निमंत्रणावरून १९ जानेवारी २०११ रोजी भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे चीनच्या पाच दिवसीय दौऱ्यावर कोणत्या उद्देशानं गेले होते? भाजपानं चीनसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध देशासमोर आणायला हवे. कदाचित या संबंधांचा देशाला फायदा होईल. भाजपा-चिनी भाई-भाई,” अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

काय म्हणाले होते जे.पी. नड्डा?

“२००५-०६मधील राजीव गांधी फाउंडेशनला डोनेशन देणाऱ्यांची यादी आहे. यात चीनच्या दूतावासानेही डोनेशन दिलं, हे स्पष्टपणे दिलं आहे. हे असं का झालं? याची काय गरज पडली? यात अनेक उद्योगपतींचीही नावं आहेत. चीनच्या दूतावासाकडून लाच घेतली हे पुरेसं नव्हतं का? चीनच्या दूतावासाकडून लाच घेण्यात आली. काँग्रेसनं याचं उत्तर द्यावं की चीनसोबत इतकं प्रेम का आहे? देशाला जाणून घ्यायचं आहे की, राजीव गांधी फाउंडेशनला इतका पैसा कोणत्या गोष्टीसाठी देण्यात आला आणि त्यांनी देशात कोणता अभ्यास केला. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार असतात. लोकांना आपल्या बाजूनं करण्यासाठी अनेक युक्त्या असतात आणि आज चीनविरोधात असे उभे आहेत, जसं की यांच्या बरोबरीचं कुणीच नाही,” असा आरोप नड्डा यांनी काँग्रेसवर केला होता.