दिल्ली पोलिसांनी एखाद्या हरवलेल्या व्यक्तीचा करतात तशी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चौकशी केल्याचा मुद्दा सोमवारी कॉंग्रेसकडून संसदेमध्ये उपस्थित करण्यात आला. राज्यसभेमध्ये यावर उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कधीही कोणाच्या घरी जाऊन हेरगिरी केली जात नसल्याचे सांगत विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून घेतली.
जेटली म्हणाले, वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल माहिती गोळा करण्याचे काम दिल्ली पोलीसांकडून पूर्वीपासून केली जाते. ज्या दिवशी पोलीसांनी राहुल गांधी यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्याचदिवशी त्यांनी नरेश आगरवाल यांच्याही निवासस्थानी जाऊन त्यांच्याबद्दल माहिती घेतली. यूपीए सरकारच्या काळात ५६२ महत्त्वाच्या व्यक्तींची अशाच पद्धतीने माहिती गोळा करण्यात आली होती, असेही त्यांनी सभागृहात सांगितले.
सुरक्षेच्या मुद्दयावरून कोणीही राजकारण करू नये, असे सांगून जेटली म्हणाले, कोणाच्या घरी जाऊन हेरगिरी केली जात नाही. त्यासाठी वेगळे मार्ग असतात. आपण सर्वांनी संसद सदस्य म्हणून आपली भूमिका पार पाडावी, सुरक्षातज्ज्ञ म्हणून काम करू नये, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. 
लोकसभेमध्येही कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा विषय उपस्थित केला. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून या विषयावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ती फेटाळली आणि शून्यकाळात हा विषय उपस्थित करण्याची सूचना केली.
राहुल गांधी सध्या सुटीवर असल्याने पोलिसांनी केलेल्या या चौकशीला ‘हेरगिरी’ ठरवून काँग्रेस नेत्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला होता. टीव्ही वा इंटरनेटच्या जमान्यात राहुल गांधी यांच्या दिसण्याचे तपशील त्यांच्याच कार्यालयातून गोळा केल्याने दिल्ली पोलिसांच्या कारभाराविषयी अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले होते.