राहुल गांधी यांची आक्रमक भूमिका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लवकरच आक्रमक प्रचार सुरू करण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी दिले. काँग्रेस पक्ष आता चांगलाच ताजातवाना झाला असून तो भाजप आणि त्याच्या वैचारिक सल्लागार असलेल्या संघ परिवाराला नेस्तनाबूत करण्यास एकटाच समर्थ आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या रक्तातच धर्मनिरपेक्षता आहे आणि ती वेगळी करता येणार नाही, हीच आमच्या संघटनेची डीएनए आहे आणि काँग्रेस पक्ष अलीकडेच चांगलाच ताजातवाना झाला असून लवकरच पक्षाचे नवे रूप पाहावयास मिळेल. भाजप आणि संघ परिवाराचा केवळ पराभवच नव्हे तर त्यांना नेस्तनाबूत करू, असे राहुल गांधी म्हणाले.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीवर्षांनिमित्त दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेस संघ परिवाराशी लढत नसल्याचे निरीक्षण नोंदविणे योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले. संघ परिवाराशी लढा देणारी सर्वात मोठी शक्ती काँग्रेसच आहे, असेही ते म्हणाले.
देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त करून राहुल गांधी म्हणाले की, घटनेच्या मूल्यांना उघड विरोध करणाऱ्या हुकूमशाही संघटनेला इतिहासात प्रथमच निर्णायक सत्ता मिळाली आहे. सर्व भारतीयांना अभूतपूर्व आव्हाने आणि पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे, असेही ते म्हणाले.

इतिहास वाचा-भाजपचा सल्ला
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला उद्देशून केलेल्या हुकूमशाही वक्तव्यावर भाजपने प्रतिहल्ला चढविला आहे. काँग्रेस सत्तेत असतानाच अल्पसंख्याकांविरुद्ध प्रचार करण्यात आला होता, असे भाजपने म्हटले आहे. राहुल गांधी यांना भाषणे लिहून देणाऱ्यांनी भारताचा इतिहास वाचलेला दिसत नाही, असेही भाजपने म्हटले आहे.दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजवटीत राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून जन्माला आले नाहीत हे राहुल यांचे सुदैव आहे, असे भाजपने म्हटले आहे.

जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती वर्षांनिमित्त दिल्लीत दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, व इतर मान्यवर उपस्थित होते.