राज्यसभेची उमेदवारी; कमलनाथ सरकारवरील संकट कायम

नवी दिल्ली : काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार संकटात आणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने शिंदे यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली.

सव्वा वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेसला ज्योतिरादित्य यांनी मंगळवारी जोरदार धक्का दिला. शिंदे आणि त्यांच्या समर्थक २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार संकटात सापडले. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांनी बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. ज्योतिरादित्य हे आपल्या कुटुंबात परतत असून, आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे नड्डा या वेळी म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपप्रवेश कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मध्य प्रदेशासाठी आपण आपल्या पूर्वीच्या सहकाऱ्यांसह जे स्वप्न पाहिले होते, ते गेल्या १८ महिन्यांत उद्ध्वस्त झाले. काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही, अशी टीका शिंदे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी व्यासपीठ दिले असल्याचे नमूद करत शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. देशाचे भवितव्य मोदी यांच्या हाती सुरक्षित असल्याचे शिंदे म्हणाले.

उदयनराजे, आठवलेंनाही उमेदवारी

भाजपने राज्यसभेसाठी बुधवारी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह उदयनराजे भोसले आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पोटनिवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.