दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
 त्यांनी पहिल्या चार महत्त्वाच्या पदांपैकी तीन पदे काँग्रेसच्या भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेकडून (एनएसयुआय)हिसकावली आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) उमेदवार अमन अवाना व उत्कर्ष चौधरी यांनी अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदे पटकावली आहेत. याच संघटनेच्या राजू रावत यांना सह सचिवपद मिळाले आहे. काँग्रेसच्या भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या करिष्मा ठाकूर यांची सचिवपदी निवड झाली आहे. काल दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेसाठी ४० टक्के मतदान झाले होते, त्यात अभाविपने बाजी मारली. गेल्यावर्षीच्या निवडणुकीत एनएसयुआयने सर्व महत्त्वाच्या जागा पटकावल्या होत्या. यावर्षीचा प्रचार हा महिलांची सुरक्षा व चार वर्षांचा पदवी कार्यक्रम यावर केंद्रित होता. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी १२, सचिव पदासाठी १७, सहसचिवपदासाठी १० उमेदवार रिंगणात होते. दिल्ली विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने दिल्ली विद्यापीठातील या निवडणुकीच्या निकालांना विशेष महत्त्व आहे.