विदेशी महिलेच्या घरात मध्यरात्री जबरदस्तीने घुसून कायदा व सुव्यवस्था हाती घेणारे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांचा राजीनाम्याची मागणी दिल्ली प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. भारती यांना पदावरून न हटविल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेवू, असा इशारा प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी दिल्याने ‘आप’चा ताप वाढला आहे. पोलीसांच्या निलंबनासाठी आंदोलन करणाऱ्या केजरीवाल यांनी भारती यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान लवली यांनी दिले आहे.    
वेशाव्यवसाय चालवत असल्याच्या संशयावरून सोमनाथ भारती आपल्या समर्थकांसह  युगांडाच्या एका महिलेच्या घरात शिरले होते. तेथेच त्यांनी पोलीसांशी हुज्जत घातली होती. संबधित महिलेने भारती व अज्ञात व्यक्तिंविरोधात पोलीसांकडे तक्रार केली होती. विशेष म्हणजे आज झालेल्या ओळखपरेडमध्ये या महिलेने भारती व त्यांच्या समर्थकांना ओळखले. भारती व त्यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. भारतींच्या हाती काठय़ा होत्या. त्यांनी मला धमकावले. असे संबधित महिलेने जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नांदविलेल्या जबानीत म्हटले आहे.
या प्रकरणी भारती यांना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावल्याने केजरीवाल यांची डोकेदुखी वाढली आहे. आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा म्हणाल्या की, विदेशी महिलेच्या घरात मध्यरात्री भारती व त्यांचे समर्थक जबरदस्तीने घुसल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण ?
दक्षिण दिल्लीत युगांडांच्या नागरिकांची वसाहत आहे. या वसाहतीत एका महिलेच्या घरी वेश्या व्यवसाय व अंमली पदार्थाचा व्यापार चालत असल्याची माहिती सोमनाथ भारती यांना १५ जानेवारीला रात्री उशीरा मिळाली. त्यानंतर भारती यांनी समर्थकांसह  महिलेचे घर गाठले. पुरावा नसताना कारवाईची मागणी भारती यांनी केली. कारवाईस पोलिसांनी नकार दिल्याने भारती व अधिकाऱ्यांध्ये वाद झाला.