कर्नाटकात निर्माण झालेले राजकीय संकट तूर्तास निवळले असले तरी त्यासाठी काँग्रेस पक्षातील नेतेच जबाबदार आहेत असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी केला आहे. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळण्याचा जो धोका निर्माण झाला होता. त्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या आणि जलसंचिन मंत्री डी.के.शिवकुमार यांच्यातील संघर्ष कारणीभूत होता असे सूत्रांनी सांगितले.

टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. मंत्रिमंडळ आणि महामंडळांमधील महत्वाच्या पदांवर समर्थकांच्या नेमणुकीवरुन दोघांमध्ये असंतोष होता. मूळात भाजपाने हे संकट निर्माण केले नाही. त्यांनी फक्त संधी बघून फायदा उचलण्याचा प्रयत्न केला असे सूत्रांनी सांगितले.

या परिस्थितीसाठी काँग्रेस स्वत: जबाबदार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय येतो किंवा इतरवेळी अन्य आमदारांनी वेगवेगळया मार्गांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण हळूहळू ती भावना कमी होत जाते सर्वांनाच मंत्रिपद मिळू शकत नाही हे सत्य सर्वजण स्वीकारतात. आम्ही सुद्धा शक्य त्या मार्गाने सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतो असे परमेश्वर म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये भाजपा सत्तास्थापनेसाठी हालचाली करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. सत्ताधारी पक्षांमधील आमदारांनी उघडपणे बंड केल्यावरच पुढील हालचाली सुरु केल्या जातील, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

भाजपामधील एका नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकमध्ये सत्ता बदल करण्यास भाजपातील पक्षश्रेष्ठी अनुकूल नाहीत. याऊलट लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- जनता दल सेक्यूलर या आघाडीवर टीका केल्यास भाजपालाच फायदा होईल, असे देखील पक्षनेतृत्वाला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्ताधारी पक्षातील आमदार फोडण्यासंदर्भात पक्षनेतृत्वाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. असे प्रयत्न केल्यास लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, याची जाणीव पक्षनेतृत्वाला असल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.