काँग्रेस सध्या पक्षनेतृत्वाच्या संकटातून जात आहे. राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला अद्यापही नवा अध्यक्ष शोधण्यात यश मिळाले नाही. परंतु यादरम्यान, रॉबर्ट वढेरा यांनी एका पोस्टद्वारे राहुल गांधी यांच्या कामाची स्तुती केली आहे. राहुल गांधी यांच्याकडून आपल्याला खुप काही शिकायला मिळाले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

देशसेवा करत असताना पक्षाच्या पदाची गरज नसते. तसेच राहुल यांच्याकडून आतापर्यंत खुप काही शिकायला मिळाले आहे. भारतात जवळपास 65 टक्के युवक (45 वर्षांखालील) आहेत. ते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवत असल्याचे वढेरा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राहुल यांनी साहसी आणि दृढ संकल्प असलेल्या व्यक्तीमत्त्वाचा परिचय दिला आहे. तसेच त्यांचे तळागाळात पोहोचून काम करणे आणि जनतेशी नाळ जोडण्याचा केलेला त्यांनी केलेला निश्चय प्रशंसनीय आहे. या सर्वात मी राहुल यांच्यासोबत असून जनसेवेसाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. अशाच परिस्थितीत रॉबर्ट वढेरा यांनी ही पोस्ट लिहिली आहे. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेकांनी त्यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु राहुल आपल्या निर्णयावर ठाम होते. तसेच त्यानंतर प्रियंका गांधी यांनीदेखील फार कमी लोकांकडे निर्णय घेण्याची क्षमता असल्याचे सांगत राहुल यांची स्तुती केली होती.