News Flash

सचिन पायलट यांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले “पेट्रोलच्या किंमती तर…!”

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केंद्राती मोदी सरकारवर वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरून निशाणा साधला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरून सचिन पायलट यांची मोदी सरकारवर टीका!

गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलनं १०० रुपये प्रतिलीटर दर गाठला आहे. काही शहरांमध्ये तर डिझेलनं देखील शंभरी गाठण्यासाठी पेट्रलसोबत स्पर्धा लावली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनं देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या विरोधात आदोलनं देखील केली आहेत. सातत्याने वाढणाऱ्या किंमती आणि महागाईवरून काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केंद्रातील मोदी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. सचिन पायलट सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते राज्यातील काँग्रेस नेत्यांना भेटी देत आहेत.

६ महिन्यांत ६६ वेळा किंमती वाढल्या!

डेहराडूनमध्ये काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला. “देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे अनेक कुटुंबांना पुरेसं अन्न देखील मिळत नाहीये. फक्त पेट्रोलचाच विचार करायचा झाला, तर अनेक राज्यांमध्ये पेट्रलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. गेल्या ६ महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास ६६ वेळा वाढल्या आहेत. यावरूनच केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचंच धोरण असल्याचं दिसून येत आहे”, असं ते म्हणाले.

पेट्रोलच्या किंमतीचा पुन्हा भडका; जाणून घ्या तुमच्या शहरामधील आजचे इंधनाचे दर

पेट्रोल दरवाढीचा महागाईवर थेट परिणाम

दरम्यान, यावेळी बोलताना सचिन पायलट यांनी पेट्रोल दरवाढीचा महागाईवर परिणाम होत असल्याचं सांगितलं. “सध्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली, की सगळ्याच गोष्टी महाग होत आहेत. आणि त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिक गणितावर होतोय. आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

२३ कोटी जनता ७ वर्षांत दारिद्र्यरेषेखाली!

सचिन पायलट यांनी गेल्या ७ वर्षांत २३ कोटी जनता दारिद्र्यरेषेखाली आल्याचं देखील यावेळी सांगितलं. “पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी सातत्याने वाढवली जात आहे. केंद्राकडून पेट्रोलवर प्रतिलीटर ३३ रुपये तर डिझेलवर प्रतिलीटर ३२ रुपये सेस लावला जात आहे. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा आम्ही पेट्रोलच्या किंमती वाढवण्याचे प्रस्ताव फेटाळून लावले होते. पण हे सरकार जाणूनबुजून लोकांवर महागाईचा भार टाकत आहे”, असं देखील पायलट म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 9:37 am

Web Title: congress sachin pilot targets modi government on petrol price today diesel rate pmw 88
Next Stories
1 “कबूतरं जामीन आदेश घेऊन येतील, या अपेक्षेने आजही…”; संथ कारभारावरून सर्वोच्च न्यायालय घेतलं फैलावर
2 पंजाबमध्ये ढवळाढवळ करू नका, मोठी किंमत मोजावी लागेल; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचं सोनिया गांधींना पत्र
3 UPSC : राखीव प्रवर्गातील उमेदवारांना गुण देताना होतोय भेदभाव? दिल्लीच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा मोठा दावा!