देशभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. सुरुवातीला ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’, असा सरकारचा नारा होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या मुलींचे रक्षण करण्यात अपयशी ठरले. आता ‘भाजपापासून मुलींना वाचवा’, असा नवा नारा देण्याची वेळ ओढावल्याची टीका त्यांनी केली.

दिल्लीतील तालकटोरा मैदानात सोमवारी काँग्रेसतर्फे संविधान बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संबोधित केले. मोदी सरकारच्या धोरणांचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय की वाल्मिकी समाजातील व्यक्ती जे काम करतात ते फक्त पोट भरण्यासाठी नसते. ते अध्यात्मासाठी हे काम करतात. यातून मोदींची मानसिकता दिसून येते. त्यांच्या मनात दलितांसाठी जागाच नाही, असे राहुल गांधींनी सांगितले. मोदींच्या मनात गरीब, महिला आणि दलितांसाठी जागा नाही. देशात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. या देशाचे संविधानच महिला, दलित आणि गरीबांचे रक्षण करणार, असे त्यांनी सांगितले.

देशाला संविधान काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, आयआयटी, आयआयएम आणि निवडणूक आयोगसारख्या संस्था या संविधानामुळेच मिळू शकल्या. संविधानाशिवाय काहीच शक्य झाले नसते. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हा संविधानाचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनता न्यायाधीशांकडे न्याय मागते. पण आता देशातील न्यायाधीश जनतेकडे न्याय माागू लागले आहेत. सुप्रीम कोर्टाची गळचेपी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांनी संसदेचे कामकाज रोखून ठेवले आहे, असेही ते म्हणालेत.  मुलींवर बलात्कार होतात. उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार आहे. पण मोदी त्यावर काहीच बोलत नाही. पूर्वी सरकारचा नारा होता की बेची पढाओ, बेटी बचाव. पण आता भाजपपासून मुलींना वाचवा, असा नारा देण्याची वेळ आली, असे त्यांनी नमूद केले. आता देशातील जनता २०१९ मध्ये त्यांच्या मन की बात सांगेल, असे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, असा दावाही केला.