गोवा, मणिपूर आणि मेघालयमध्ये यापूर्वी सरकार स्थापनेबाबत ज्या घटना घडल्या त्या अनुषंगाने कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेचा भाजपने केलेला दावा मोडीत निघत असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षासमवेत कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या भूमिकेचे समर्थन करताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसने परंपरा आणि घटनात्मक निकषांनुसार कृती केली आहे.

मणिपूरमध्ये ६० जागांसाठी मार्च २०१७ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसने २८ तर भाजपने २१ जागा जिंकल्या. निकालानंतर आघाडी झाली आणि राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन्यासाठी निमंत्रित केले. मेघालयमध्ये ६० जागांसाठी मार्च २०१८ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसने २१ जागा तर भाजपने केवळ दोन जागा पटकावल्या. परंतु निवडणूक निकालानंतर एनपीईपी, यूडीपी, पीडीएफ, एचएसडीपीडीपी आघाडी झाल्यानंतर राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले, असेही प्रवक्त्याने ट्वीट केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. एखादा पक्ष अथवा पक्षांच्या समूहाने सर्वाधिक जागा जिंकल्या असतील तर त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करणे हे मार्गदर्शक तत्त्व असल्याने त्यावेळी वाजपेयी यांना निमंत्रित करण्यात आले होते, असे उदाहरण सुरजेवाला यांनी दिले. काँग्रेस आणि जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) ९५ जागा पटकावल्या असून २० जागांवर त्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत त्यामुळे आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे, त्याचप्रमाणे आघाडीकडे ५६ टक्के मते आहेत. माजी राष्ट्रपती नारायणन यांनी १२ मार्च १९९८ रोजी वाजपेयी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करून उचित आणि घटनात्मकदृष्टय़ा योग्य कृती केली होती, असेही प्रवक्त्याने सांगितले.

काँग्रेस मागील दरवाजाने सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने केला त्याबाबत काँग्रेसने गोवा, मणिपूर आणि मेघालय राज्यांची उदाहरणे दिली. या राज्यांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय मिळविलेला असतानाही तेथे काँग्रेस सरकार स्थापन करू शकली नाही. त्यामुळे सर्वात मोठय़ा पक्षाला निमंत्रित करण्याचा भाजपचा दावा या उदाहरणांवरून मोडीत निघत आहे.

गोव्यामध्ये ४० जागांसाठी मार्च २०१७ मध्ये निवडणूक झाली. त्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा तर भाजपने १३ जागा पटकावल्या. मात्र निकालानंतर भाजप, मगोप आणि जीएफपीच्या आघाडीला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले, असे प्रवक्त्याने ट्वीट केले आहे.