भाजप आणि काँग्रेस नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांचे वाकयुद्ध आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही पाहायला मिळू शकते. यापुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याठिकाणी परदेश दौऱ्यावर जातील, त्याठिकाणी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना पाठविण्यात येईल. हे नेते त्याठिकाणी नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षासंदर्भात केलेल्या विधानांचा प्रतिवाद करतील, अशी माहिती राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा यांनी दिली. आम्ही यापुढे सर्व देशांमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना पाठवू. ती किंवा तो नेता मोदींनी दौऱ्यादरम्यान विरोधी पक्षावर केलेल्या आरोपांचे पत्रकार परिषद घेऊन तात्काळ खंडन करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत १६ देशांना भेटी दिल्या आहेत. सध्यादेखील ते फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी गुरूवारी टोरांटो येथे भारतीय जनसमुदायासमोर केलेल्या भाषणात यूपीए सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. यापूर्वीच्या सरकारने जी करायची ती घाण केली. मात्र, आता आम्ही ती घाण साफ करू, असे विधान मोदींनी भाषणादरम्यान केले होते. याशिवाय, भारताची ‘स्कॅम इंडिया’ ही प्रतिमा बदलून ‘स्किल इंडिया’ अशी करू, असे सांगत मोदींनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला हात घातला होता.
परदेशी भूमीत काँग्रेसवर टीका करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या कृतीवर आनंद शर्मा यांनी आक्षेप घेतला. मोदी हे परदेशात भारताचे प्रतिनिधी म्हणून जातात. त्याठिकाणी पूर्वीच्या सरकारवर अशाप्रकारे टीका करणे हे केवळ परंपरेला छेद देणारे आणि वाईट अभिरूचीचे प्रदर्शन घडविणारे आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठाही खालावत असल्याचे शर्मा यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. इतका परिपक्व आणि जबाबदार विरोधी पक्ष असल्यामुळेच सरकारला संसदेत इतकी विधेयके मंजूर करून घेणे शक्य झाल्याचा दावाही शर्मा यांनी यावेळी केला.