पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमामध्ये झळकणार आहेत. कार्यक्रमाचा सुत्रसंचालक बेअर ग्रिल्सनेच यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. या कार्यक्रमामध्ये मोदी बेअरबरोबर उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भटकताना दिसणार आहेत. मात्र ही बातमी समोर आल्यानंतर काँग्रेसने या कार्यक्रमावरुन मोदींवर लक्ष्य केलं आहे. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले तेव्हा मोदी कुठे होते असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी ट्विट करुन मोदींना लक्ष्य केलं आहे. ‘पुलवामामध्ये सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या चित्रिकरणात सहभागी होऊन आनंद लुटत होते. त्यांना या चित्रिकरणात एवढी मजा येत होती की या क्रूर हल्ल्याबद्दल त्यांना सांगितल्यानंतरही हे चित्रिकरण सुरु ठेवण्यात आले. या ट्रेलरमध्ये मोदी निष्काळजीपणे हसताना दिसत आहेत,’ असं शमा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बेअर ग्रिल्सने ट्विटवरुन शेअर केलेल्या टिझरमध्ये पंतप्रधान मोदी आणि बेअर जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामधील घनदाट जंगलामधून प्रवास करताना दिसत आहेत. पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मोदी जीम कॉर्बेटमध्ये ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’चे चित्रिकरण करत होते. मोदी पुलवामा हल्ल्यानंतर जीम कॉर्बेटमध्ये गेले नाहीत.

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांनंतर विरोधी पक्षांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांना लक्ष्य केलं होतं. एकीकडे जवान शहीद होत असताना मोदी चित्रिकरणात व्यस्त होते असा आरोप विरोधकांनी केला होता.

या टिकेनंतर पंतप्रधान कार्यालयामधून स्पष्टिकरण देण्यात आले होते. यामध्ये मोदी रुद्रपूरमध्ये सभेसाठी गेले होते त्यावेळी पाऊस वाढल्याने ते जीम कॉर्बेटमध्ये तीन तास थांबल्याचे म्हटले होते. जीम कॉर्बेटमध्ये त्यांनी टायगर सफारी, इको टुरिझम झोन आणि प्राणी संवर्धन केंद्राला भेट दिल्याचे पीएमोने स्पष्ट केले होते.

दरम्यान, प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी मोदी ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ कार्यक्रमात सहभागी झाले आहेत असं बेअरने ट्विट करुन सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग असणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’चा हा विशेष भाग डिस्कव्हरी इंडियावर ऑगस्ट १२ रोजी रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणार आहे.