एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अभिषेक मनू संघवी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक ट्विट केलं. त्यांच्या या ट्विटवरून काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हैराण केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या विचारधारेशी भलेही ते सहमत नसतील तरी तथ्य नाकारता येणार नाही. सावरकरांनी स्वातंत्र्य आणि दलितांच्या अधिकारांसाठी मोठा संघर्ष केला आणि देशासाठी ते तुरूंगातही गेले, असं ट्विट त्यांनी केलं.

संघवी यांचं ट्विट व्हायरल झाल्यानंतर त्यांना अहमद पटेल यांनी फोन केला असल्याचं माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये छापलेल्या ‘डेल्ही कॉन्फिडेन्शीअल’ या कॉलममधून समोर आली आहे. तसंच मतदानाच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारचं ट्विट कस करू शकता? असा सवालही केला असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु संघवी यांच्या मते पटेल यांनी त्यांना फोन करून केवळ त्यांच्या ट्विटचा अर्थ विचारला होता. आपण व्यक्तीगतरित्या सावरकरांच्या विचारांशी सहमत नाही. परंतु त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण असून ते आपण नाकारू शकत नाही. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला. तसंच देशासाठी त्यांनी तुरूंगवासही भोगल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- “ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत पंतप्रधान नाही; ‘एनआरसी’बाबत काही करू शकत नाहीत ”

यापूर्वी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रशंसा केली होती. आम्ही सावरकरांच्या विरोधात नाही, तर हिंदुत्वाच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले होते. तसंच तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवरील टपाल तिकिटही काढल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.