काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी त्यांनी ब्रिटनच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची शैली स्विकारण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर काम करण्यास रस निर्माण होईल. त्यामुळे पक्ष पुन्हा एकदा अधिकाधिक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होऊ शकेल, असे मत काँग्रेसचे वरीष्ठ नेते खासदार शशी थरुर यांनी व्यक्त केले आहे.

पीटीआयशी बोलताना थरुर म्हणाले, काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाबाबत निर्णय होत नसल्याने निर्माण झालेल्या संभ्रामावस्थेमुळे पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचे तसेच काँग्रेसमध्ये सुधारणा घडवून आणायची असेल तर कार्यकारिणीसह पक्षातील सर्व प्रमुख पदांसाठी निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या भुमिकेला पाठींबा दर्शवत सक्षम तरुण नेत्याचीच अध्यक्षपदी निवड करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

थरुर म्हणाले, पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा आपले नशिब आजमावण्याबाबत निर्णय घेऊ शकतील. मात्र, अध्यक्षपदासाठी त्यांनी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय गांधी कुटुंबाचा असेल. दरम्यान, त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीवर असंतोष व्यक्त केला आणि म्हटले की, काँग्रेस ज्या परिस्थितीतून जात आहे त्यातून कुठलेच स्पष्ट उत्तर मिळत नाहीए, एकूणच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांचेही नुकसान होत आहे. यामुळे पक्षात महत्वाचे निर्णय घेणाऱ्या नेत्याची, नवसंजीवनी निर्माण करणाऱ्या नेत्याची कमतरता भासत आहे.

काँग्रेसच्या कार्यकारीणीतील सदस्यांनी पक्षाच्या हंगामी कार्यकारी अध्यक्षाचे नाव जाहीर करावे आणि आपला राजीनामा द्यावा. त्यानंतर कार्यकारीणीसहित पक्षातील सर्व प्रमुख नेतृत्वपदांसाठी मतदान घेतले जावे. यामुळे पुढे येणाऱ्या नेत्यांना एक प्रकारे स्विकार्हता मिळेल आणि त्यांना पक्षाचे नेतृत्व करण्याचा विश्वासू जनादेशही मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.