पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणार ंभाषण केलं. यामध्ये मोदींनी अगदी करोनापासून ते केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केलं. सध्या देशभरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सुरु असणारी शेतकरी आंदोलने, तसेच दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असणारं शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर मोदींनी विरोधकांकडून होत असणाऱ्या टीकेचाही समाचार आपल्या भाषणात घेतला. यावेळी नव्या कृषी कायद्यांमधील तरतुदींबद्दल आक्षेप घेणाऱ्या आणि अनेक ठिकाणी आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या काँग्रेसलाही मोदींनी सुनावले. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.
कृषी कायद्यासंदर्भातील भूमिका काँग्रेसने बदलली असून त्यांनी यू-टर्न घेतला आहे असं मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं. तसेच काँग्रेस आंदोलनामध्ये सहभागी होत आहे याबद्दल काहीही आक्षेप नसला तरी त्यांनी शेतकऱ्यांनाही मागील अनेक वर्षांपासून असणारी यंत्रणा आता बदलण्याची गरज आहे हे ही सांगणं महत्वाचं होतं, असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं. पुढे बोलताना कृषी धोरणांसंदर्भात यू-टर्न घेणाऱ्यांसाठी आपण मनमोहन सिंग यांचं एक जुनं वक्तव्य वाचून दाखवत असल्याचं सांगत पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला. यामध्ये मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना त्याचा माल विकण्याचा अधिकार नसल्याचं नमूद केलं होतं. मात्र शेतकऱ्यांना हा अधिकार मिळायला हवा तसेच कृषी बाजारपेठा अधिक खुल्या करण्याची गरज मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती. कृषी बाजारपेठांना परावलंबी बनवणारी व्यवस्था बदलण्याचा आमचा उद्देश आहे असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं, असा दाखला मोदींनी दिला. १९३० पासून असणाऱ्या कृषी मालविक्रीसंदर्भातील यंत्रणा नव्याने उभारण्याची गरज असल्याचे सांगताना मनमोहन सिंग यांनी म्हटल्याचंही मोदींनी सांगितलं. यावरुनच पुढे मोदींनी, “काँग्रेस माझं ऐकणार नाही किमान मनमोहन सिंग यांचं तर ऐकेल” असं म्हणत टोला लगावला. “आम्ही कृषी क्षेत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आहो उलट तुम्हाला (काँग्रेसला) अभिमान वाटला पाहिजे की जे मनमोहन सिंग बोलले होते ते मोदीला करावं लागत आहे असं तुम्ही म्हटलं पाहिजे,” असं म्हणतं मोदींनी काँग्रेसला सुनावलं. मोदींच्या या वक्तव्यानंतर भाजपा खासदारांनी टेबल वाजवून मोदींच्या या वक्तव्याचं समर्थन केलं.
आणखी वाचा- राष्ट्रपतींचं भाषण न ऐकूनही अनेकजण बरचं काही बोलले; मोदींचा विरोधकांना चिमटा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन कृषी कायद्यांमधील मूळ मुद्द्याबद्दल कोणी बोलत नसल्याचंही सांगितलं. कृषी कायद्याचा जो मूळ गाभा आहे त्याबद्दल कोणी बोलत नसून घाई घाईत कायदा संमत करण्यात आला वगैरे विषयांवर बोललं जात आहे. आहो, एवढं मोठं आपलं कुटुंब आहे तर थोडा गोंधळ होणारच. लग्नाच्या कार्यात नाही का एखादा पाहुणा पाहुणचार मिळाला नाही म्हणून नाराज होतो, तसाच प्रकार आहे हा. एवढं मोठं आपलं कुटुंब आहे तर थोडंफार असं होणार, असं म्हणत मोदींनी या कायद्याच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2021 11:48 am