काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी एकीकडे गुजरातच्या मंदिरांना भेटी देत आहेत. तर दुसरीकडे कपिल सिब्बल यांनी राम मंदिराची सुनावणी २०१९ च्या निवडणुकांनंतर करावी अशी भूमिका घेतली. काँग्रेसचा हा दुटप्पी चेहरा आहे अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात मंगळवारी झालेल्या सुनावणीत राम मंदिर आणि बाबरी प्रकरणाला ८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली. मात्र सुन्नी वक्फ बोर्डातर्फे कपिल सिब्बल यांनी या प्रकरणातील साक्षी विविध भाषांमध्ये असल्याने आणि त्या साक्षी हजारोंच्या संख्येत असल्याने या प्रकरणाची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकानंतर करावी अशी मागणी करणारा एक विनंती अर्ज केला होता. मात्र हा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला. मात्र नेमका हाच मुद्दा पुढे करत अमित शहा यांनी काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले आहे.

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे जेव्हा सोमनाथ मंदिरात गेले होते तेव्हा त्यांच्या नावाची नोंद अहिंदू रजिस्टरमध्ये करण्यात आली. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. दस्तुरखुद्द राहुल गांधी यांनीही ते शिवभक्त आहेत असे स्पष्ट केले होते. जर राहुल गांधी स्वतःला शिवभक्त म्हणवून घेत आहेत तर मग कपिल सिब्बल हे राम मंदिराच्या सुनावणीसाठी २०१९ च्या निवडणुकांनंतरची तारीख का मागत आहेत असा प्रश्न शहा यांनी विचारला. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सध्या गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विरूद्ध भाजप अशी आरोप प्रत्यारोपांची भट्टीच पेटली आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्याचमुळे सुप्रीम कोर्टात जी मागणी कपिल सिब्बल यांनी केली त्यावरून अमित शहा यांनी काँग्रेसवर शरसंधान केले.