नेहरु-गांधी कुटुंबावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी काँग्रेसने माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप त्यांच्या नातवाने केला आहे. यावेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नरसिम्हा राव यांच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणीही केली. नरसिंह राव यांचे नातू एन व्ही सुभाष सध्या भाजपाशी संलग्न आहेत. नरसिंह राव यांची आज जंयती असून एकाही काँग्रेस नेत्यांना त्यांना आदरांजली वाहिली नाही असा आरोप यावेळी त्यांनी केला.

‘१९९६ मध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने नरसिम्हा राव यांना अनेक गोष्टींसाठी जबाबदार धरलं. त्या गोष्टींचा सरकारच्या धोरणांशी काही संबंध नव्हता. नेहरु-गांधी कुटुंबाव्यतिरिक्त एखादी व्यक्ती मुख्य प्रवाहात असेल तर त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार नाही असं वाटल्यानेच त्यांना दुर्लक्षित करण्यात आलं’, असा आरोप एन व्ही सुभाष यांनी केला आहे.

‘काँग्रेस पक्षाच्या अपयशासाठी नरसिंह राव यांना जबाबदार धरण्यात आलं. पण त्यांच्या योगदानाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मी मागणी करतो. त्यांना आदरांजली वाहिली पाहिजे’, असं एन व्ही सुभाष यांनी म्हटलं आहे.

एन व्ही सुभाष यांनी २०१४ मध्ये भाजपात प्रवेश केला. तेलंगणामध्ये ते भाजपाचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत. आज नरसिम्हा राव यांची ९८ वी जयंती असून तेलंगणामधील काँग्रेस नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली नसल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, नरसिंह राव यांचा लोकसभेत उल्लेख केल्याबद्दल एन व्ही सुभाष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना १९९१ मध्ये आर्थिक धोरण राबवल्याबद्दल नरसिंह राव यांचं कौतुक करत देशाच्या विकासात योगदान दिल्याचं सांगितलं. यावेळी काँग्रेसला टोला लगावताना नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली.

२००४ ते २०१४ दरम्यान सत्तेत असणाऱ्यांनी कधीही वाजपेयींनी केलेल्या चांगल्या कामाचा उल्लेख केला ? नरसिंह राव यांच्या चांगल्या कामाबद्दल ते कधी बोलले का ? त्याच लोकांनी या सभागृहात मनमोहन सिंग यांचाही कधी उल्लेख केला नाही असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.