नवी दिल्ली

पूरग्रस्त केरळला मदत देण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करीत असल्याचा आरोप करून काँग्रेसने त्यांना, ‘हृदय मोठे करा आणि केरळला आणखी मदत करा,’ असे आवाहन सोमवारी केले.

काँग्रेसचे नेते जयवीर शेरगिल म्हणाले, ‘पंतप्रधानांनी केरळला उशिरा मदत जाहीर केली. तीही ५०० कोटी एवढी कमी. केरळला आणखी मदत देऊन केरळमधील पुराला राष्ट्रीय संकट जाहीर करावे.’

पंतप्रधानांनी स्वतच्या जाहिरातीसाठी पाच हजार कोटी, आपल्या तंदुरुस्तीच्या ध्वनिचित्रफितीसाठी ३५ कोटी आणि भाजपच्या मुख्यालयावर ११०० कोटी खर्च केले आहेत. पण अस्मानी संकटामुळे १९ हजार कोटींचे नुकसान झालेल्या केरळला मात्र त्यांनी अवघे ५०० कोटी रुपये जाहीर केले, असेही शेरगिल म्हणाले.

मोदी स्वतची जाहिरात आणि प्रसिद्धीच्या बाबतीत आपण विशाल हृदयाचे असल्याचे दाखवतात. त्यांनी केरळच्या बाबतीतही अशीच हृदयाची विशालता दाखवावी, अशी टिप्पणी शेरगिल यांनी केली.

महाराष्ट्राचे पथक केरळला रवाना

मुंबई : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे २० कोटी रुपयांची मदत, जीवनावश्यक वस्तू, कपडे आदी साहित्य केरळला रवाना केल्यानंतर वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी सोमवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० जणांचे वैद्यकीय पथक गोळ्या-औषधांसह केरळकडे रवाना झाले आहे.