देशात करोनाचं संकट सुरू असतानाच राजकीय कुरघोड्या व आरोपांच्या फैरीही जोरात झडताना दिसत आहेत. करोनाच्या संकटातच राजस्थानमधील काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहिलं आहे. भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपाबरोबरच आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर राजस्थानमध्ये मोठं राजकीय नाट्य घडलं. या सगळ्यावरून काँग्रेसनं भाजपावर निशाणा साधला आहे.

आमदार फोडाफोडीच्या आरोपावरून राजस्थानात बंडाळी उफाळून आली. त्यामुळे काँग्रेसनं उपमुख्यमंत्री पदावरून सचिन पायलट यांनाही दूर केलं. त्याचबरोबर राज्यातील सर्व समित्यांवरील नियुक्त्याही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान काँग्रेसनं पुन्हा सचिन पायलट यांना पक्षात परत येण्याचं आवाहन केलं असून, भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून भाजपावर आमदार खरेदीचा आरोप करण्यात आला आहे.

“भाजपाने जर आमदार खरेदी करण्याऐवजी व्हेटिंलेटर्स खरेदी करण्याकडे लक्ष दिलं असतं, तर करोनातून हजारो भारतीयांचे प्राण वाचवता आले असते,” असं म्हणत काँग्रेसनं भाजपावर टीका केली आहे.

काँग्रेसच्या प्रतोदांनी केली तक्रार, नंतर…

गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी, राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार फोडण्याचे डावपेच भाजप आखत असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. त्याआधारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या कथित कारस्थानाच्या चौकशीला गती दिली. त्यासंदर्भात गेहलोत यांनी शनिवारी (१० जुलै) पत्रकार परिषद घेऊन २५-३० कोटी देऊन काँग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा आणि राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप पुन्हा केला होता. त्यानंतर याप्रकरणात पोलिसांनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यामुळे नाराज झालेल्या पायलट यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं.