करोनामुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती ओढवली असून, लॉकडाउन शिथिल केल्यानंतर करोना बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढत चालली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानंही चिंता व्यक्त केली आहे. करोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाला उपचाराची गरज आहे, प्रचाराची नाही, अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

देशात करोना रुग्णांना मिळणारे उपचार आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं स्यू मोटू याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणी वेळी न्यायालयानं चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर संबंधित राज्यांना नोटीसही बजावली आहे.

आणखी वाचा- “वेडेपणा इतका की, तीच तीच गोष्ट पुन्हा करायची आणि…”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलेल्या चिंतेचा हवाला देत काँग्रेसनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी ट्विट केलं आहे. “नोटबंदीच्या संकटाचा विक्रम लॉकडाउननं मोडला आहे. सरकारनं आपलं अपयश झाकण्यासाठी नोटबंदीच्या काळात दररोज उद्देश बदलले होते. लॉकडाउनच्या काळात सरकारनं त्यापेक्षाही अधिक बहाने बनवले. टेस्टिंग केल्या नाही. उपचार नाही. फक्त नारे. देशाला उपचार हवे आहेत, प्रचार नाही,” अशी टीका खेरा यांनी केली आहे.

आणखी वाचा- “मोदीजी, गाडीला चार चाकं असतात अन्…”; कपिल सिब्बल यांचा पंतप्रधानांना टोला

करोना संदर्भात मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही अनेक वेळा टीका केली आहे. विशेषतः सरकारनं लागू केलेला लॉकडाउन अपयशी ठरल्याचा दावा राहुल गांधी यांच्याकडून वारंवार केला जात आहे. त्यासंदर्भात राहुल गांधी लॉकडाउन लागू केल्यानंतर काय परिणाम झाले, हे दाखवणारे आलेखही ट्विट केले होते.