आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपानंतर राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला. हा संघर्ष अजूनही थांबलेला नाही. अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत आहे. राज्यातूल सुरू झालेला हा संघर्ष आता न्यायालय आणि राजभवनापर्यंतही पोहोचला आहे. दरम्यान, राज्यपाल योग्य निर्णय घेत नसल्याचा आरोप यापूर्वी मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला होता. आता राज्यपाल कलराज मिश्र हे केद्रातील मास्तरांकडूनच आलेले प्रश्न विचारत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

राज्यपाल केंद्रात बसलेल्या मास्तरांचाच सूर आवळत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते अभिषेक मनू संघवी यांनी केला आहे. “राज्यपाल अनेक गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत. तसंच करोना संकटादरम्यान कोणत्या राज्याची विधानसभा सुरू आहे असा सवालही त्यांनी केला होता. देशात अनेक राज्यांच्या विधानसभांचं कामकाज सुरू आहे. यामध्ये पुदुच्चेरी, महाराष्ट्र आणि बिहारचाही समावेश आहे. राज्यपालांनी याबाबत माहिती घ्यायला हवी,” असंही ते म्हणाले.

“राज्यपालांनी प्रश्न विचारले आणि ते सक्रिय आहेत हे चांगलंच आहे. परंतु आमदारांची उपस्थिती आणि त्यांच्या कामकाजाशी निगडीत प्रश्न हे त्यांच्या अधिकारक्षेत्राखाली येत नाहीत. हे प्रकरण संपूर्णत: विधानसभा अध्यक्ष किंवा संचिवालयाअंतर्गत येतं,” असंही त्यांनी नमूद केलं.

यापूर्वी गेहलोत यांचं पंतप्रधानांही पत्र

यापूर्वी गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पत्र पाठवलं होतं. “राजस्थानमध्ये लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकार घोडेबाजाराच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुद्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छित आहे. आपल्याकडे बहुपक्षीय पद्धती असल्यानं केंद्र व राज्यात वेगळ्या पक्षांची सरकारं निवडून येतात, हेच आपल्या लोकशाहीचं सौदर्यं आहे. करोना महामारीच्या काळात लोकांचे जीव वाचवणे हीच आमची प्राथमिकता आहे, पण अशात राजस्थान निवडून आलेलं सरकार पाडण्यात प्रयत्न केले जात आहे,” असं गेहलोत यांनी म्हटलं होतं.