पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना काँग्रेस आणि आपवर जोरादार टीका केली. त्याला काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. मोदींकडे जनतेला देण्यासाठी केवळ आश्वासनेच आहेत, गेल्या १५ वर्षांच्या राजवटीत काँग्रेसनेच दिल्लीचा जास्तीत जास्त विकास केला, असे पक्षाने म्हटले आहे; तर आम आदमी पार्टी (आप) हा फसलेला प्रयोग असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.दिल्लीत मोदींनी प्रचाराचा नारळ फोडताच काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी ट्विट केले. मोदी प्रभावी वक्ते आहेत, मात्र त्यांनी केवळ आश्वासनेच दिली असून त्यापैकी बहुसंख्य आश्वासनांची पूर्तता २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे, असे सिंघवी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आपल्या भाषणांत जनधन योजनेवर प्रकाशझोत टाकला असला तरी बहुसंख्य खाती रिक्तच आहेत, जनधन योजना काँग्रेसनेच सुरू केली आणि एनडीएने उघडलेल्या खात्यांपैकी ७५ टक्के खाती रिक्तच आहेत, असेही सिंघवी म्हणाले.