पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देतेवेळी फोटोप्रेमासाठी मार्क झकरबर्गच्या बखोटीला धरून बाजूला केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर काँग्रेसने मोदी यांचे हे वागणे बालिश असल्याची टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी गेले होते. या वेळी फेसबुकच्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी मोदी यांना एक स्मृतीचिन्ह भेट दिले. याबाबत माहिती देण्यासाठी झकरबर्ग मोदी यांच्या जवळ गेले. मात्र छायाचित्रकार हे क्षण टिपत असताना झकरबर्ग त्यांच्याकडे पाठ करून मधे आल्याने मोदी यांनी त्यांना बोलता बोलता बखोटीला धरून बाजूला केले. या प्रकाराने झकरबर्ग यांचा चेहरा लगेचच पडला होता. मोदी प्रसारमाध्यमांमध्ये नेहमी चर्चेत राहण्यासाठी काही ना काही उपक्रम करत असतात. मात्र हा प्रकार मोदी आजही शाळेतील मुलासारखे वागत असल्याचे सुतोवाच करतो, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी केली आहे.