कॅलिफोर्नियात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात गांधी घराण्यावर अप्रत्यक्षपणे केलेली टीका काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. नरेंद्र मोदींनी कॅलिफोर्नियात जाऊन देशवासियांची लाज काढली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी मोदींनी कॅलिफोर्नियात केलेल्या भाषणावर दिली. मोदींनी तेथे जाऊन आपल्या भाषणातून देशवासियांची थट्टा करून केवळ स्वत:चा उदो उदो केला. मोदींनी केलेले भाषण ऐकून मला लाज वाटली, असे रशिद अल्वी म्हणाले.

पळ काढणाऱयांना मदत करून सरकारने देशातील जनतेला मेटाकुटीस आणले आहे. घोटाळ्यांमागे घोटाळे बाहेर आलेल्या राजस्थान सरकारसारखे इतर कोणते राज्य या देशात आहे का? त्यामुळे दुसऱयांवर टीका करण्याआधी मोदींनी स्वत:च्या पक्षाकडे पाहावे, अशा शब्दांत काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी मोदींवर शरसंधान केले.

मोदींनी कॅलिफोर्नियातील सॅप सेंटर येथे उपस्थित अठरा हजार भारतीयांना संबोधित करताना विरोधकांवर अप्रत्यक्षपणे कडी केली होती. भारतीय राजकारणात कोणाच्या मुलाने १०० कोटी कमावले, मुलीने ५०० कोटी तर कोणाच्या जावयाने हजार कोटी खाल्ले, असेच आजवर जनतेला ऐकायला मिळायचे पण आता परिस्थिती बदलली आहे, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर हल्ला चढवला होता. तर, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गसोबतच्या चर्चेवेळी स्वत:च्या आईविषयी बोलताना मोदींच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. यावर प्रतिक्रिया देताना जदयू नेते के.सी.त्यागी यांनी मग मोदी स्वत:च्या आईसोबत का राहत नाहीत, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे म्हटले. तर, मोदी आईची काळजी का घेत नाहीत? तुम्ही स्वत:च्या आईचीही काळजी घेऊ शकत नाही इतका कमी पगार तुम्हाला आहे का?, असा प्रश्नांची सरबत्ती करून रशिद अल्वी यांनी मोदी केवळ ढोंगबाज असल्याचा हल्लाबोल केला.